अभ्यासवर्ग परिचय
महाशिवरात्र म्हणजे देवांचा देव महादेव यांच्या उपासनेचे परम पावन पर्व … महाशिवरात्रीचे माहात्म्य अपरंपार आहे. आर्य संस्कृतीमध्ये भगवान शिवजींचे स्थान सर्व देवांमध्ये सर्वोच्च मानले गेले आहे. फक्त भारतात नाही तर जगभरात शिवाची कोणत्या ना कोणत्या रूपात उपासना केली जाते. सर्वाधिक प्राचीन देवांमध्ये भगवान शंकर हेच सृष्टीचे नियंता, पालनकर्ता आणि संहारक मानले गेले आहेत. त्यांच्याच ईच्छेने या सृष्टीचे अविर्भवन होते आणि त्यांच्याच इच्छेने हिचा विनाश होतो. भगवान शिव हे केवळ पौराणिक देव नाहीत, तर पंचदेवांमध्ये प्रधान आणि अनादिसिद्ध परमेश्वर आहेत. निगमागम आदी सर्व शास्त्रांमध्ये महापंडित असे महादेव आहेत. वेदांनी त्यांना परम तत्व, व्यक्त,अजन्मा, सर्वांचे कारण, विश्व प्रपंचाचे स्वामी असे संबोधून त्यांचे गुणगान केले आहे. श्रुतींनी स्वयंभू शांत,प्रपंचातीत, परात्पर, ईश्वरांचेही परम महेश्वर असे म्हणून त्यांची स्तुती केली आहे. शिव याचा अर्थ आहे - कल्याणस्वरूप आणि कल्याणप्रदाता. परब्रम्हाच्या या कल्याण रूपाची उपासना उच्चकोटीचे सिद्ध आत्मकल्याणेच्छुक साधक आणि सर्वसाधारण आस्तिक जन, या सर्वांसाठी परम मंगलमय, परम कल्याणकारक, सर्व सिद्धीदायक आणि श्रेयस्कर आहे म्हणून प्राचीन काळापासून देव, दानव,ऋषी महर्षी, योगेंद्र,मुनींद्र,सिद्धगंधर्व इतकेच नव्हे तर ब्रह्मा,विष्णू यांनीही महादेवांची उपासना केली आहे. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचे परम आराध्य दैवत आहेत.
श्री शिव महापुराण हे एक प्रमुख आणि सुप्रसिद्ध पुराण आहे. शिवप्रभूंना अत्यंत प्रिय असलेले हे पुराण पावन शिवतीर्थ आहे. शैवांचे सर्वस्व आहे. शिवज्ञानाचे महान भंडार आहे. या सद्ग्रंथात परात्पर परब्रम्ह परमेश्वराच्या शिव म्हणजेच कल्याणकारी स्वरूपाचे तात्विक विवेचन,रहस्य,महात्म्य आणि त्याच्या उपासनेचे विस्तृत वर्णन आहे. तसेच नानाविध शिवावतार, अद्भुतरम्य शिवलीला, पूजापद्धती, ज्ञानप्रद आख्याने, शिक्षाप्रद गंभीर उपदेश,रोचक आणि प्रेरणादायी कथांचे सुंदर संयोजन आहे. हा ग्रंथ चतुर्विध पुरुषार्थ निरूपण, कर्म-ज्ञान- भक्ती-योग विषयक विवेचन, व्रते, तीर्थे, विविध चरित्रे, शिवक्षेत्रांच्या कथा, लिंग -रुद्राक्ष -भस्म -काशी कैलास आदींचे माहात्म्य, शिवभक्तीचा महिमा,पाशुपत योग- अशा अनेक अशा अनेक विषयांनी विभूषित आहे.
कोणतीही उपासना, पारायण किंवा अनुष्ठान नीट समजून समजून केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी मिळते असे शास्त्र सांगते.या अभ्याक्रमाने श्री शिव महापुराण ग्रंथ माहात्म्य, त्याचा इतिहास, निर्मिती, उद्देश, त्यातील ज्ञान भांडार, माहात्म्य, पारायण - पठण पद्धती यांचे ज्ञान सहभागी व्यक्तींना मिळेल. अनेक शंकांचे निरसन होईल.